Wednesday 23 April 2014

पाप म्हणजे नक्की काय?

तुला ही नव्हतं वाटलं, मला ही नव्हतं वाटत कधी हे असं होईल म्हणून.
मध्यरात्री मुसळधार पाऊस कोसळत असेल माझ्या घरावर,
आणि तुझी साधी आठवण काढणं सुद्धा पाप वाटू लागेल मला.
पण पाप म्हणजे नक्की काय गं ?

आपण डोघांनी मिळून समुद्र किनारी झेललेला तो पाऊस?
मला शोधण्यात, भर दुपारी तू ती केलेली वणवण?
एका संध्याकाळी मला तू ऐकवलेलं ते 'सहेला रे'?
मी भुकेला असताना तू मला करून घातलेला तो वरण भात?
गुल्जारची कविता ऐकताना आपल्या भोवती दाटलेला तो theater चा अंधार?
तुझं लग्नं ठरल्यावर आपण दोघांनी मिळून घेतलेलं आणि तसंच वितळून गेलेलं ते ice-cream?
तुझ्या लग्नाचं present म्हणून मी स्वतः तुला शिवून दिलेली ती गोधडी?
लग्नानंतर पहिल्यांदा घरी आल्या आल्या तू मला केलेला तो phone?
तुझा pregnancy बद्दल एकही शब्द न बोलता सासरच्या bunty कुत्र्याबद्दल बोलण्यात घालवलेले ते ३ तास?
की मला हा जागवणारा तुझा रात्रीचा आवडता पाऊस?
तूच सांग पाप म्हणजे नक्की काय?

पुण्य म्हणजे काय हे ही मला माहित नाही आणि पाप म्हणजे काय हे मी शोधतोय अजून ही.
माझ्या आत पसरलेलं दुःख कुणाला माहित नसलं तरीही, तुझ्या आठवणींनी होणारं सुख तेवढं माहित आहे साऱ्यांना.
ह्या पावसात मी चिंब भिजायला उभा राहिलोय रस्त्यात,
तुला ही नसेल वाटलं कधी, मला ही नव्हतं वाटलं की कधी मध्यरात्री मुसळधार पावसात मी भर रस्त्यात भिजत असेन असा,
आणि तू कुठल्या तरी तळघरात गाढ झोपी गेलेली असशील, जिथे पावसाचा साधा आवाजही पोहोचणार नाही कधीच!


- Poem by 'Saumitra' (सौमित्र)
Kishore Kadam writes using this pen name.

No comments:

Post a Comment